मुंबई, 23 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्याआधी हे शूटर्स खोपोली रोडवर असलेल्या जंगलात गेले होते. या जंगलात जाऊन त्यांनी नेमबाजीचा सराव केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पलासदरी गावाजवळील जंगलात नेमबाजीचा सराव केला होता. यावेळी ह्या आरोपींनी झाडावर गोळ्या झाडून सराव केला होता, असे पोलीस तपासातून समोर आले आहे.
https://x.com/ANI/status/1848756773769109525?t=IzpinfEsM8sVgSaWN8SCoQ&s=19
आतापर्यंत 10 आरोपींना अटक
12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर लगेचच मुंबई पोलिसांनी गुरनैल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन शूटर्सना घटनास्थळावरून अटक केली होती. त्यानंतर या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी प्रवीण लोणकर आणि हरीश निषाद यांना अटक केली. तसेच याप्रकरणात पोलिसांनी आणखी 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या हत्या प्रकरणी 20 ऑक्टोंबर रोजी भगवंत सिंग नावाच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. या आरोपींची सध्या पोलीस चौकशी केली जात आहे.
एक आरोपी फरार
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर गुरनैल सिंग, धरमराज कश्यप आणि शिवकुमार गौतम या तीन शूटर्सनी गोळीबार केला होता. त्यातील शिवकुमार गौतम सध्या फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी मुंबई गुन्हे शाखेची पथके अनेक राज्यांत पाठविण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे बिष्णोई टोळीशी काही कनेक्शन आहे का? याचा तपास देखील पोलीस करीत आहेत.