पुणे, 23 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकांची नेमणूक केली आहे. यादरम्यान पुणे शहरातील हडपसर परिसरात एका व्यावसायिकाकडून 22.90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बक्तुमल सुखेजा असे या व्यावसायिकाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रहिवासी आहे. ही कारवाई निवडणूक आयोगाने नाकाबंदीदरम्यान केली आहे.
https://x.com/ANI/status/1848907707568525767?t=IQ35HiHbhBY93EUgqOvr2A&s=19
दौंडच्या व्यावसायिकाची रक्कम
22 ऑक्टोंबर रोजी दौंड तालुक्यातील रहिवासी असलेल्या बक्तुमल सुखेजा नावाच्या व्यावसायिकाकडून 22 लाख 90 हजार रुपये स्टॅटिक सर्व्हिलन्सच्या पथकाने जप्त केले. तत्पूर्वी, नाकाबंदीच्या कारवाईदरम्यान निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांना हडपसर परिसरात रोखले आणि त्यांच्याकडील ही रक्कम जप्त केली. दरम्यान, जप्त करण्यात आलेले हे पैसे आपण एपीएमसी मार्केट यार्डातील बँकेत जमा करणार होतो, असा दावा या व्यावसायिकाने केला आहे. ही रोकड आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्सच्या पथकाने हडपसर परिसरातील सोलापूर रोडवरील मांजरी फाटा येथे जप्त केली. त्यानंतर त्यांनी या रक्कमेच्या पुढील तपासासाठी आयकर विभागाला कळवले. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1848609700813935024?t=jy3342PpO1iQUTkCPqN6cw&s=19
यापूर्वी 5 कोटी जप्त केले होते
तत्पूर्वी, सोमवारी (दि.21) रात्री उशिरा खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार जणांची चौकशी केली. तर पुढील तपासासाठी ही रोख रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. ही रक्कम कोणाची आहे? त्याची पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.