मुंबई, 22 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आज (दि.22) भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात सचिन वाझे यांना जमीन मंजूर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टाने आता सचिन वाझे यांना जामीन दिला आहे.
https://x.com/ANI/status/1848680652482482315?t=Gh1JylI6n7d3n3sz64apUg&s=19
पण तुरूंगातच राहणार
याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना यापूर्वीच जामीन देण्यात आला असल्याने सचिन वाझे यांना देखील जामीन देण्यात यावा, अशी मागणी यावेळी त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती. त्यांची ही मागणी मुंबई हायकोर्टाने मान्य केली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना आता जामीन मिळाला असला तरीही ते तुरूंगातून बाहेर येणार नाहीत. कारण, सचिन वाझे यांच्या विरोधात मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील खटला सुरू आहे. या आरोपाखाली सचिन वाझे सध्या तुरूंगातच राहणार आहेत.
या प्रकरणात झाली होती अटक
दरम्यान, 2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले होते. तसेच त्यानंतर ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या प्रकरण उघडकीस आले होते. या दोन्ही प्रकरणाच्या आरोपांखाली पोलिसांनी सचिन वाझे यांना त्यावेळी अटक केली होती. तसेच त्यांना याप्रकरणी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.