पुणे, 21 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच याप्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. राज रविंद्र जागडे असे अटक केलेल्या 22 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो सिंहगड रोड येथील वडगाव बुद्रूक येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. या आरोपींची सध्या पोलीस चौकशी करण्यात येत आहे.
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडगाव पुलाखाली 17 ऑक्टोंबर रोजी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पुण्यातील हिंगणे खुर्द येथील नवीन कॅनोल रोड आनंदवन हेरीटेज बिल्डींग जवळ दोन ते तीन जण गावठी पिस्तूल घेऊन उभे असल्याची खात्रीशीर माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना हे तिघे जण रस्त्याच्या कडेला एकमेकांसोबत बाचाबाची करत असल्याचे आढळले. त्यांना पोलीस आल्याचे कळताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, पोलिसांच्या पथकाने त्यांना लगेचच पकडले.
यावेळी पोलिसांनी राज जागडे नावाच्या आरोपीला अटक केली. तेंव्हा त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस होते. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांकडे एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी हे गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त केली आणि त्या अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या या एका गावठी पिस्तूलाची किंमत 40 हजार रुपये आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.