बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक, अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 वर

मुंबई, 20 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि माजी मंत्री नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भगवंत सिंग असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतील बेलापूर येथून अटक केली. त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. दरम्यान, भगवंत सिंग याने बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या नेमबाजांना शस्त्रे पुरवली होती. ही शस्त्रे त्याने राजस्थानहून मुंबईत आणली होती. तसेच भगवंत सिंग याने या नेमबाजांची राहण्याची व्यवस्था केली होती, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

https://x.com/ANI/status/1847988350768324776?t=vS4TmMfIse2UkZgPQMaVUg&s=19

बाबा सिद्दीकी यांच्यावर 12 ऑक्टोंबर रोजी रात्री तीन जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन शूटर्सना अटक केली. तर यातील आणखी एक शूटर अद्याप फरार आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार निषाद या आरोपांना अटक केली. त्यानंतर 18 ऑक्टोंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक केली होती.



अशातच आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपांना आणखी काही दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात या आरोपींकडून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हे सर्व आरोपी बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *