बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न व संसद विशिष्टरत्न पुरस्कार

बारामती, 4 ऑगस्टः बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी खा.सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने दिला आहे. सदर पुरस्कार फौंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी पोस्ट आज, 4 ऑगस्ट 2022 रोजी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पिण्याच्या पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी निवेदन

हा पुरस्कार दर पाच वर्षांनी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येतो. लोकसभेतील सुप्रिया सुळेंची उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यासाठी सलग 7व्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. यंदा त्यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कारही प्रदान केला आहे. दरम्यान, या पुरस्काराची घोषणा फेब्रुवारी महिन्यात केली होती. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले.

गत 16व्या लोकसभेत सुळेंनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चा सत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी एकूण 1986 प्रश्न उपस्थित केले, तर 22 खासगी विधेयके मांडली. सुळेंच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी चालू अधिवेधनात आता पर्यंत म्हणजे 29 जुलै 2022 पर्यंत 93 टक्के उपस्थिती लावत 187 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण 456 प्रश्न त्यांनी विचारले असून 10 खासगी विधेयके मांडली आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा मला लोकसभेत पाठविले. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचा आहे. या सर्वांचे मनापासून आभार. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करीत आहे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *