पुणे, 18 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची बातमी आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी 5 जणांना अटक केली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात याच्याआधी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंग, धरमराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार निषाद अशी अटक केलेल्या 4 आरोपींची नावे आहेत. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे.
https://x.com/ANI/status/1847238306440126844?t=osm5IoKUJGjOEve-iVkFUQ&s=19
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे परिसरात 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांकडून प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार निषाद या आरोपांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. हे तीनही पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत.
https://x.com/ANI/status/1847226974307307968?t=hAKWP2M49x0EGcI-qo7Zuw&s=19
झिशान सिद्दीकी यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
यादरम्यान बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी झिशान सिद्दीकी यांना बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासाची माहिती दिली.