दिल्ली, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत 2025-26 वर्षांसाठी 6 रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. यामध्ये गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
https://x.com/PIB_India/status/1846488570237993004?t=GAgN-Jxi9gGx1PDHwmovBQ&s=19
या पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ
त्यानुसार, गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ झाल्यामुळे त्याचा दर आता 2 हजार 425 रुपये इतका झाला आहे. तसेच बार्लीच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 130 रुपयांची वाढ झाल्यामुळे त्याचा दर 1 हजार 980 रुपये इतका झाला आहे. हरभऱ्याच्या आधारभूत किमतीत 210 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे त्याच्या दरात प्रति क्विंटल 5 हजार 650 रुपयांची वाढ झाली आहे. मसूरच्या दरात 275 रुपयांची वाढ झाल्यामुळे त्याच्या दरात प्रति क्विंटल 6 हजार 700 वाढ झाली आहे. मोहरीच्या आधारभूत किमतीत 300 रुपयांची वाढ केल्यामुळे त्याचा दर प्रति क्विंटल 5 हजार 950 इतका झाला आहे. तसेच करडईच्या आधारभूत किमतीत आता 140 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे करडईचा नवीन दर आता प्रति क्विंटल 5 हजार 940 रुपये इतका झाला आहे.
आधारभूत किंमत म्हणजे काय?
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी आधारभूत किंमत महत्त्वाची मानली जाते. समजा, एखाद्या वेळी बाजारातील भाव जरी कमी झाले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी म्हणून सरकारकडून आधारभूत किंमत निश्चित केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. दरम्यान केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठी आधारभूत किंमत जाहीर केली जाते.