सलमान खानच्या हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी एका आरोपीला अटक

मुंबई, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अशातच पनवेल शहर पोलिसांनी सुखा नावाच्या एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याला हरियाणातील पानिपत येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचेही म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. आरोपी सुखा याला आता नवी मुंबईत आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दरम्यान, सुखा याने पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे.

https://x.com/AHindinews/status/1846754318038585587?t=kcSXkSI8DasqADPiwiHrUQ&s=19

काय आहे प्रकरण?

तत्पूर्वी, एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर ठार मारण्याचा कट रचल्याचे या आरोपींच्या चौकशीतून समोर आले होते. त्यासाठी या आरोपींनी सलमानच्या फार्महाऊसची रेकी केली केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. तसेच त्यावेळी हे हल्लेखोर सलमान खानच्या फार्महाऊसच्या जवळ राहत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर खळबळ

गेल्या काही वर्षांपासून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आलेल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी सलमानचे मित्र असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणाचा बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर, सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकरणाचा अनेक बाजूंनी तपास सुरू असून, याप्रकरणाचा लवकरच उलघडा केला जाईल, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *