मुंबई, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. या तीन पिस्तूलापैकी एक ऑस्ट्रेलियन ग्लॉक पिस्तूल, एक तुर्की पिस्तूल आणि देशी बनावटीचे पिस्तूल आहे. ही तीनही पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तत्पूर्वी, बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर हल्लेखोरांनी 9 एमएम पिस्तुलाचा वापर केला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या हत्याकांडात एक नव्हे तर तीन पिस्तूलांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
https://x.com/ANI/status/1846611354112643464?t=BEQQhHVaA7RKxsBbCvsSGQ&s=19
मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (दि.12) रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक केली आहे.
https://x.com/ANI/status/1846219688642240546?t=7szcUUL22CYM1DLOVANlCQ&s=19
आतापर्यंत चार जण अटकेत
गुरमेल सिंग, धरमराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार निषाद अशी अटक केलेल्या 4 आरोपींची नावे आहेत. यातील गुरमेल सिंग आणि कश्यप हे आरोपी हल्लेखोर यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटींग शिकले होते. हे आरोपी मॅगझीनशिवाय मुंबईत शूटिंगचा सराव करायचे, असे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अजून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके विविध राज्यांत पाठविण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणी अजून कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.