दिल्ली, 16 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (दि.16) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी एकूण 9 हजार 448 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
https://x.com/PIB_India/status/1846495071874777453?t=hA7pA6ITGl5sFIx-xOX2oA&s=19
1 जुलैपासून निर्णयाची अंमलबजावणी
सरकारच्या या निर्णयाचा फायदा एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता मूळ वेतनाच्या 53 टक्के इतका महागाई भत्ता मिळणार आहे. 1 जुलै 2024 पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढ केली जाते. पण यावर्षी महागाई भत्त्यात वाढ करण्यास काही महिने विलंब झाला होता. अखेर आज सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही भेट मिळाली आहे.
इतका पगार वाढणार!
दरम्यान, महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50 हजार रुपये आहे. 3 टक्क्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आता दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा अतिरिक्त महागाई भत्ता मिळणार आहे. त्यासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या थकबाकीची एकूण 4 हजार 500 रुपयांची रक्कम देखील मिळणार आहे.