राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू, दोघांना अटक

मुंबई, 12 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात शनिवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या हत्येच्या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

https://x.com/ANI/status/1845148248325116224?t=OLe_4PTBbq4WcwklPHtVHQ&s=19

https://x.com/PTI_News/status/1845157157949538616?t=4k_gvNV-4VL6s2VSvxU0Yw&s=19

दोघांना अटक, एक जण फरार

मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील निर्मल नगरमधील कोलगेट मैदानाजवळ त्यांचे पुत्र आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक उत्तर प्रदेश आणि दुसरा आरोपी हरियाणा राज्यातील आहे. तर या गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. झालेली ही घटना अतिशय दुदैवी असून, या फरार आरोपीचा मुंबई पोलीस नक्कीच शोध घेतील आणि त्याला अटक करतील. तसेच या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

https://x.com/BabaSiddique/status/1755456516746850437?t=tZlpKh1zHFdeHzvl8k4VbQ&s=19

48 वर्षानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी

बाबा सिद्दीकी हे राजकरणात असले तरीही त्यांचे बॉलिवूडशी एक वेगळे नाते आहे. बाबा सिद्दीकी हे इफ्तार पार्टीमुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत. ते ईदच्या निमित्ताने दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. त्यांच्या या इफ्तार पार्टीमध्ये शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त यांसारख्या बड्या सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती येत असतात. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील 48 वर्षांचा राजकीय प्रवास समाप्त केला होता.

तीन वेळा आमदार राहिले होते!

बाबा सिद्दीकी यांचा जन्म 13 सप्टेंबर 1958 रोजी झाला. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये किशोरवयातच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार बनले होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *