68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात लाखो भीम अनुयायी दाखल

नागपूर, 12 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी (दि.12) नागपुरातील दीक्षाभूमी येथे देशभरातून लाखो भीम अनुयायी आलेले आहे. त्यानिमित्त सध्या याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ऑक्टोबर 1956 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेंव्हापासून आजच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी याठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.

https://x.com/airnews_nagpur/status/1845050765674525171?t=JYBHxn7-Y-PjclAws2grDw&s=19

आज दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे आज सायंकाळी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भीम अनुयायी सध्या नागपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. तसेच यासाठी दीक्षाभूमी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अनुयायींची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने राज्यभरातून नागपूर येथे येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

महानगरपालिकेकडून जय्यत तयारी

दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष सोयी सुविधा दिल्या आहेत. यामध्ये महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र 950 पेक्षा अधिक शौचालयांची व्यवस्था केली आहे. तसेच महिला आणि पुरूषांकरिता प्रत्येकी 25 अशा एकूण 50 स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने विशेष बसची सोय केली आहे. याशिवाय जर अचानक पाऊस आल्यास अनेक ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये, याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *