लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे येण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर, 08 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमातून दिली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकूण 3 हजार रुपये जमा होणार आहेत.

https://x.com/CMOMaharashtra/status/1842953295985263013?t=wxqViuJDZ8QFA4ua_ska-A&s=19

लाभाची रक्कम वाढणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद तर पडणार नाहीच, उलट भविष्यात त्याच्या लाभाची रक्कम देखील टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गरिबीची जाणीव असल्याने राज्य सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

महिलांना 7500 रुपयांचा लाभ

यापूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा एकूण 4 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3 हजार रुपये मिळाल्यानंतर या योजनेतील लाभार्थी महिलांना एकूण 7500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, हे पैसे मिळण्यासाठी पात्र महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यातील महिलांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *