अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय जारी

मुंबई, 05 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (दि.04) पासून करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून दिली आहे. त्यानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1842251811471638622?t=o4mk2U_CMrJkFU0JoH8DBA&s=19

मानधनात इतकी वाढ

यामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मूळ वेतनात 3000 हजारांची वाढ करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना 1600 ते 2000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या पगारात 5000 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. तर अंगणवाडी मदतीसांच्या मूळ वेतनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी मदतीसांना प्रति महिना 800 ते 1000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडी मदतीसांच्या वेतनात 3 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. ही सुधारित वाढ 1 ऑक्टोंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

कामकाजामध्ये 2 तासांची वाढ

दरम्यान, मानधनातील ही वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये 2 तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आल्याचे राज्य सरकारने या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यानुसार, या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या किंवा कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा आणि उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *