दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा बांगलादेशवर 7 गडी राखून विजय

कानपूर, 01 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज समाप्त झाला. कानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताने हे लक्ष्य 3 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर भारताने बांगलादेश विरुद्धची 2 सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल हा सामनावीर ठरला. तर रविचंद्रन अश्विन हा मालिकावीर ठरला आहे.

https://x.com/BCCI/status/1841036502731575491?t=QJCqIAchY0ZwqN9BGYi6CA&s=19

पहिल्या डावात 52 धावांची आघाडी

तत्पूर्वी, या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला होता. पावसामुळे या सामन्याचे दोन दिवस वाया गेले होते. या कसोटी सामन्याच्या बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. यामध्ये बांगलादेशकडून मोमिनुल हक याने सर्वाधिक नाबाद 107 धावांची खेळी केली. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करून 9 बाद 285 या धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. यावेळी भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली होती. पहिल्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर केएल राहुलने देखील 68 धावांची खेळी केली.

भारताचा शानदार विजय

त्यानंतर भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर समाप्त झाला. यावेळी दुसऱ्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आणि तर आकाश दीप याने एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लाम याने 50 धावांची खेळी केली. त्यानंतर बांगलादेशकडून मिळालेल्या 95 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. त्यावेळी संघाची 55 धावसंख्या असताना कर्णधार रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल 6 धावांवर बाद झाला. यावेळी यशस्वी जैस्वालने 51 धावांची शानदार खेळी केली. त्याने विराट कोहली सोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने दुसऱ्या डावात नाबाद 29 धावा केल्या. तसेच रिषभ पंत 4 धावांवर नाबाद राहिला. अशा रीतीने भारताने 3 विकेट गमावून 95 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *