महिन्याच्या सुरूवातीलाच महागाईचा झटका; गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ

दिल्ली, 01 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी गॅस गॅसच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 48.50 रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून (दि.01) लागू झाली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या या गॅस सिलिंडरची किंमत आता 1740 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाब्यांमधील मधील जेवण महागण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

https://x.com/ANI/status/1840949755939066042?t=iTogoc3_youI8QAUFRCQVg&s=19

पहा किती रुपयांची वाढ?

या दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1691.50 रुपयांवरून 1740 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तसेच मुंबईत याची किंमत 1644 रुपयांवरून 1692.50 रुपये इतकी झाली आहे. तर कोलकात्यात 1802.50 रुपयांवरून 1850.50 रुपये आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1855 रुपयांवरून 1903 रुपये इतकी झाली आहे.

घरगुती गॅसचे दर स्थिर

दुसरीकडे, तेल विपणन कंपन्यांनी 14 किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 9 मार्च 2024 रोजी करण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली होती. तेंव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यानुसार, मुंबईत सध्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *