येत्या 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी

पुणे, 25 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 24 तासांत राज्यभरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, राज्यातील पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना आज (दि.25) पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

https://x.com/Info_Pune/status/1838891338030371298?s=19

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

यासोबतच आजच्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील बुधवारी (दि.25) येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट

राज्यातील बहुतांश भागांत सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची ही परिस्थिती उद्याही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार, राज्यातील पुणे, ठाणे रायगड धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना उद्या (दि.26) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केला गेला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *