झाली घोषणा! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ‘या’ तारखेपासून मिळणार

मुंबई, 24 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना लवकरच मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचा लाभ पात्र महिलांना 29 सप्टेंबरपासून मिळणार आहे. हे पैसे पात्र महिलांना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहेत. याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.

आदिती तटकरे यांची घोषणा

तत्पूर्वी, गेल्या महिन्यातील 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. परंतु, सप्टेंबर महिन्याची 17 तारीख उलटून गेल्यानंतरही या योजनेचा तिसरा हप्ता जमा झालेला नव्हता. त्यामुळे तिसरा हप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांकडून उपस्थितीत करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर, आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरपासून जमा होणार असल्याचे सांगितले आहे.

29 तारखेपासून पैसे मिळणार

दरम्यान, येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमातून पात्र महिलांना तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही तांत्रिक बाबींमुळे राहिलेल्या महिला लाभार्थी आणि सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच, ज्या पात्र महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा महिलांना 29 सप्टेंबर रोजी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.

2 कोटी महिलांना लाभ होणार

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 2 कोटी महिलांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी त्यांचा अर्ज 30 सप्टेंबर रोजी जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन भरावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *