पुणे, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या तीन ते चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
https://x.com/anupamkashyapi/status/1837521573856923986?s=19
विजांच्या कडकडाटासह पाऊस?
राज्याच्या विविध भागांत येत्या 22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुरेशा आर्द्रतेचे वारे येऊ लागले आहे. तसेच राज्यात सध्या दिवसा उन्हाचे वातावरण असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. दिवसाचे उच्च तापमान आणि आर्द्रता यांमुळे राज्याच्या विविध भागांत दुपारपासून वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण होयला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील तीन ते चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेचे माजी हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.