वडगावशेरी मध्ये भाजपला धक्का! माजी आमदाराचा शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश

पुणे, 18 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजप नेते बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

https://x.com/NCPspeaks/status/1836041003670663441?s=19

वडगावशेरी मध्ये तुतारी विरूद्ध घड्याळ?

यावेळी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात बापूसाहेब पठारे यांच्यासह त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे वडगावशेरी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत वडगावशेरी मध्ये तुतारी विरूद्ध घड्याळ असा सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बापूसाहेब पठारे यांची माहिती

दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर बापूसाहेब पठारे यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *