बारामती, 11 सप्टेंबर: बारामती नगर परिषद हद्दीतील रूई येथील गट क्रमांक 38 सामायिक गटातील 30 गुंठे लाटण्यासाठी एका संचालकाने सदरची जमीन बारामतीच्या एमआयडीसी मधील एका प्रसिद्ध संस्थेच्या वस्तीगृहासाठी पाहिजे, अशी बतावणी केली. त्यासाठी या संचालकाने त्या संस्थेच्या एका नेत्याला सदर जागेवर नेऊन जागेचे दर्शन करून आणले. तसेच त्याने सदरची जमीन मूळमालक विना मोबदला या संस्थेला देत असल्याचे असे खोटे सांगून मूळ मालकाला फसवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत संचालकाने (ज्येष्ठ नगरसेवक) कॅनल शेजारच्या कार्यालयामध्ये प्रेमाने गोड बोलवून दमदाटी केली. याप्रकरणी तक्रार घेऊन सदरचे प्रकरण मोठ्या साहेबांकडे गेल्यावर संचालकांना जाब विचारल्यानंतर सदरचे प्रकरण अवसानात गुपचूप बंद पेटीत बंद करायचे आदेश मोठ्या साहेबांनी दिले. परंतु, ही बातमी संस्थेच्या आसपासच्या परिसरातील शेतकरी आणि जमीनदार यांच्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संबंधित संस्थेच्या परिसरातील जमीनधारक आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती नगर परिषदेच्या मार्फत आरक्षण टाकून, विकास कामे थांबून, विकासाच्या नावावर जमीन हडप करण्याचे तसेच शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना देशोधडीला लावण्याच्या धमक्या संचालकांकडून (ज्येष्ठ नगरसेवक) दिल्या जात असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी पक्षात आपली पत वाढावी, म्हणून नेत्यांची दिशाभूल करून सर्वसामान्य मतदारांना देशोधडीला लावणाऱ्या मलिदा गँगला नेते केव्हा चाप बसवणार? हाच प्रश्न सध्या बारामतीमधील मतदारांमध्ये पडला आहे.