मुंबई, 05 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी काल (दि.04) रात्री त्यांचा संप मागे घेतला. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 3 सप्टेंबर रोजी बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे एसटी बसची वाहतूक टप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपावर तोडगा काढण्यासाठी काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6 हजार 500 रूपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
https://x.com/mieknathshinde/status/1831560282587415033?s=19
मुख्यमंत्री शिंदे यांचे ट्विट
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल आम्ही सामोपचाराने सर्वसहमत होईल असा तोडगा काढला आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आता कोंकणासह राज्यभरात गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसमोरचा मोठा अडथळा दूर झाला आहे. आपल्या या लाल परीमधूनही काही गणपती बाप्पा घरात येतात. त्यांच्या आगमनाची तयारी उत्साहाने आपल्याला करता येईल. आमच्या माता-भगिनींना, वृद्धांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना आता एसटीने आनंदाचा प्रवास करता येईल,” असे मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या मागण्यांवर ही चर्चा
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एप्रिल 2020 पासून 6 हजार 500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास देणे, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे यांसारख्या आदी विषयांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.