सरकारने शेतकरी पण लाडका असल्याचे दाखवून द्यावे – राज ठाकरे

मुंबई, 04 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. राज्य सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. शेतकरी देखील लाडका असल्याचे सरकारने दाखवून द्यावे, असे राज ठाकरे यांनी यामध्ये म्हटले आहे.

https://x.com/RajThackeray/status/1831185807610114322?s=19

शेतकरी ही लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे!

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. कित्येक पिके अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभे झालेली पिके नष्ट होणे आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणे कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावे. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, राज ठाकरेंच्या सुचना

तसेच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावे. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरले आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपले वाटोळ कोणी केले तेही जनतेला समजेल! असे ते म्हणाले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात नुकसान भरपाई मिळावी

या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावे, असे राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *