मुंबई, 03 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून (दि.03) बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने आपल्या मान्य कराव्या अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावे. यासारख्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे बहुतांश ठिकाणी एसटी बसेस बंद आहेत. अशा परिस्थितीत सध्या प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
https://x.com/msrtcofficial/status/1830860737067020795?s=19
एसटी महामंडळाचे निवेदन प्रसिद्ध
त्यामुळे या संपावर राज्य सरकारने तोडगा काढला नाही तर, ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने उद्या (दि.04) बैठक बोलावली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिली आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे.
उद्या बैठक बोलावली
उद्या दि. 04 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावले आहे. तरी, महामंडळाच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी या निवेदनातून केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक तसेच वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक देण्यात यावा. जुन्या एसटी बस बंद करून स्वतःच्या मालकीच्या नवीन बस खरेदी कराव्यात. कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या मूळ वेतनात सरसकट 5 हजार रुपये देण्यात यावे. एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा पास मोफत देण्यात यावा, यांसारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.