पुणे, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पुण्यात भर चौकात हत्या केल्याची घटना घडली आहे. वनराज आंदेकर हे काल (दि.01) रात्री वनराज आंदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ पुण्यातील इनामदार चौकात उभे होते. त्यावेळी अचानकपणे आलेल्या जवळपास 12 ते 15 जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपींचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
https://x.com/ANI/status/1830391127255507282?s=19
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे पुण्यातील इनामदार चौकात त्यांच्या चुलत भावासोबत बोलत उभे होते. त्यावेळी 12 ते 15 जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. तेंव्हा या हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 राऊंड गोळीबार केला. तसेच त्यांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर हे सर्व हल्लेखोर लगेचच दुचाकीवरून पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
याप्रकरणी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी 5 राऊंड गोळीबार केला. त्यापैकी एकाही गोळी त्यांना लागली नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तर वनराज आंदेकर यांचा मृत्यू धारधार शस्त्राने वार केल्यामुळे झाला असून, त्याच्या अनेक खुणा आंदेकर यांच्या शरीरावर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखा आणि इतर पथके नियुक्त केली आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले आहे.