तलाठी अधिकाऱ्याची कार्यालयातच हत्या; आरोपीला अटक

हिंगोली, 29 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका तलठ्याची कार्यालयातच हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथील तलाठी कार्यालयात बुधवारी (दि.28) ही घटना घडली. संतोष पवार असे या मृत तलाठी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात विविध कलमानुसार हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने हल्ला

दरम्यान, हा तलाठी आपली जमीन दुसऱ्याच्या नावावर करून देत असल्याची चुकीची माहिती आरोपीला कुठून तरी मिळाली होती. या खोट्या माहितीच्या आधारे या व्यक्तीने तलाठी संतोष पवार यांचा भरदिवसा कार्यालयात जाऊन खून केला. यावेळी आरोपीने संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्याने त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संतोष पवार यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

तलाठी संघटनेकडून निषेध

या घटनेवरून राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. त्यासाठी आज त्यांच्याकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तलाठी संघटनेने केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

https://x.com/Jayant_R_Patil/status/1829082421540598176?s=19

कणा नसलेले सरकार, जयंत पाटलांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील तलाठी अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात ‘कणा नसलेले सरकार’ आहे हेच सिद्ध होतय. याआधी आम्ही युपी, बिहारला असे प्रकार घडतात असे ऐकत होतो. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत हे पाहून वेदना होतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *