पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छ. शिवरायांचा पुतळा वर्ष पूर्ण होण्याआधीच कोसळला

मालवण, 26 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज (सोमवारी) अचानकपणे कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या स्मारकाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. परंतू, या स्मारकाचे उद्घाटन एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच हा पुतळा आज कोसळला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध करून या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

https://x.com/supriya_sule/status/1828018554794385648?s=19

या घटनेची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

दरम्यान, या घटनेवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही पंतप्रधानांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

https://x.com/VijayWadettiwar/status/1828023213923729476?s=19

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, स्वराज्याचे मूळ. शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले अजून शाबूत आहेत पण २०२३ रोजी सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे

पंतप्रधान मोदी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आता हा पुतळा कोसळला. आठ महिन्यात छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. किमान तुमच्या टक्केवारीत छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडायला हवे होते. असे त्यांनी म्हटले आहे. छत्रपतींच्या मूल्यांना आधारित हे सरकार नाहीच, हे सिद्ध झाले आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे हे आम्ही का म्हणतोय हे आज महाराष्ट्रातील जनतेला दिसतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, पण ज्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची अहवेलना केली असेल त्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदाराचे सुरू असलेले सर्व काम तातडीने काढून घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *