आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीत भीषण स्कोट, मृतांची संख्या 17 वर

अनकापल्ले, 22 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत बुधवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनकापल्ले येथील अच्युथापुरम सेझमधील एका कंपनीत हा स्फोट झाला. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या तपास केला जात आहे.

https://x.com/ANI/status/1826436979233530316?s=19

https://x.com/AHindinews/status/1826290057751503343?s=19

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अच्युतापुरम फार्मा कंपनी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आज (दि.22) अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युथापुरम येथील या दुर्घटना स्थळाला भेट देणार आहेत. यावेळी ते या कंपनीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे फार्मा कंपनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले अच्युतापुरम येथील एका फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. तसेच त्यांनी यावेळी जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी सध्या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. तसेच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *