मुंबई, 21 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी आल्या आहेत. तसेच राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर, 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या तारखेला घेण्यात याव्या आणि राज्य सेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करण्यात यावा, या मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत परीक्षा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
https://x.com/ANI/status/1826074650172076386?s=19
https://x.com/mpsc_office/status/1824460417231458406
परीक्षेच्या तारखा बदलण्यास आयोगाचा नकार
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी एमपीएससीने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले होते. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब करीता संयुक्त चाळणी परीक्षा दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तरी या परीक्षा नियोजित दिवशीच घेण्यात येतील,” असे त्यांनी या निवेदनात म्हटले होते. एमपीएससीच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1826170351149060150?s=19
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे. तसेच आज दुपारी यासंदर्भात एक बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.