डॉक्टर तरूणीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या देशव्यापी संप

कोलकाता, 16 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने 17 ऑगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे. या संपात देशातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयएमएने केले आहे. या संदर्भातील निवेदन आयएमएने प्रसिद्ध केले आहे.

https://x.com/ANI/status/1824136518254072038?s=19

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

या क्रूर घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी 24 तास संपाची घोषणा केली आहे. त्यानुसार, शनिवारी (दि.17) सकाळी 6 ते रविवारी (दि.18) सकाळी 6 पर्यंत देशातील सर्व हॉस्पिटल मधील ओपीडी सेवा बंद राहणार आहेत. तर या संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती आयएमएने त्यांच्या निवेदनातून दिली आहे.

9 ऑगस्ट रोजी घटना उघडकीस

दरम्यान, 9 ऑगस्ट 2024 च्या पहाटे कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना घडल्यापासून निवासी डॉक्टर संपावर आहेत. आयएमएकडून देशभरात निदर्शने आणि कँडल मार्चही काढण्यात आले आहेत. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *