बारामती, 11 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले होते. याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिली होती. माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप पुन्हा एकदा सुरू झालेले आहे. त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप टीम आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे आभार मानले आहेत.
https://x.com/supriya_sule/status/1822535939656401008?s=19
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
“माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व,” असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की, आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन ही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. आपण याआधी सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालेले पाहिलेले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याच्या घटनेमुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या विविध प्रकारच्या सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड कोणासोबत शेयर करू नये आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशन सेटिंग चालू करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.