कोल्हापूर, 11 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी (दि.08) रात्री भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाऊन या नाट्यगृहाची पाहणी केली. तसेच त्यांनी या दुर्घटनेबाबत स्थानिक कलाकारांशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. केशवराव भोसले नाट्यगृह होते तसेच पुन्हा ते उभारू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
https://x.com/mieknathshinde/status/1822303347711361034?s=19
नाट्यगृह आहे तसे पुन्हा उभारण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रात्री नाट्यगृहाची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. कोल्हापूरकरांच्या भावना या नाट्यगृहाशी किती खोलवर जोडल्या आहेत, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. कोल्हापूर शहराचे हे वैभव पुर्नस्थापित करणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी सरकारकडून 20 कोटी रुपये आणि 5 कोटी विम्याचे असे एकूण 25 कोटी रुपये देऊन ही वास्तू पुन्हा एकदा होती तशीच उभी करू असे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकार उपस्थित होते.
अचानकपणे आग लागली
दरम्यान, ऐतिहासिक परंपरा लाभलेले कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी रात्री भीषण आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, या आगीत या नाट्यगृहाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शॉक सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे.