ऑलिंपिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने घेतली कुस्तीतून निवृत्ती

पॅरिस, 08 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. विनेश फोगट हिने गुरूवारी (दि.08) सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स वर एक भावनिक पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. “आई, कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली मी हरले, माफ करा, तुमचे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले आहे यापेक्षा जास्त ताकद राहिली नाही आता. अलविदा कुस्ती 2001-2024, मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व,” असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

जास्त वजनामुळे स्पर्धेतून बाद

तत्पूर्वी, विनेश फोगट हिने 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात स्थान मिळवले होते. परंतु, या सामन्याच्या आधी तिला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विनेश फोगट ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाद झाली. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एक निवेदन प्रसिद्ध केले. यात त्यांनी म्हटले की, “भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट जी 50 किलो फ्रीस्टाइल गटात सुवर्णपदकाची लढत खेळणार होती. परंतु, जास्त वजनामुळे त्याला या सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. टीमने रात्रभर तिचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पण आज सकाळी तिचे वजन 50 किलोपेक्षा थोडे जास्त होते. भारतीय संघाकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. आम्ही सर्वांना विनंती करतो की विनेशच्या गोपनीयतेचा आदर करा.”

रौप्य पदक मिळणार का?

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सूत्रानुसार, विनेश फोगटने क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडे (सीएएस) तिला रौप्य पदक देण्याची विनंती केली आहे. या संदर्भातील निकाल गुरुवारी सकाळी अपेक्षित आहे. त्यामुळे तिला रौप्य पदक मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *