पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का, महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदकाच्या लढतीसाठी अपात्र

पॅरिस, 07 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला जास्त वजनामुळे सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. यापूर्वी, विनेश फोगट हिने 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात स्थान मिळवले होते. परंतु, तिला आता जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विनेश फोगट ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाद झाली आहे. तसेच तिला आता रौप्य पदकही मिळणार नाही.

https://x.com/AHindinews/status/1821073829298630816?s=19

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे निवेदन

तत्पूर्वी, विनेश फोगट हिचा अमेरिकेच्या महिला कुस्तीपटू विरोधात आज दुपारी पावणे एक वाजता सामना होणार होता. मात्र, त्याआधीच भारताला हा मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगट ही पॅरिस ऑलिम्पिक मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. “भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला जास्त वजनामुळे महिलांच्या 50 किलो कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले. अत्यंत निराशाजनक बातमी आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट जी 50 किलो फ्रीस्टाइल गटात सुवर्णपदकाची लढत खेळणार होती. परंतु, जास्त वजनामुळे त्याला या सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. टीमने रात्रभर तिचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पण आज सकाळी तिचे वजन 50 किलोपेक्षा थोडे जास्त होते. भारतीय संघाकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. आम्ही सर्वांना विनंती करतो की विनेशच्या गोपनीयतेचा आदर करा. जेणेकरून तिला आगामी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करता येईल,” असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.

अंतिम सामन्यात प्रवेश केला होता

तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये याच्याआधी विनेश फोगट हिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करून इतिहास रचला होता. तिने मंगळवारी (दि.06) महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता. त्याबरोबरच ती ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *