दिल्ली, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने गुरूवारी (दि.01) राज्यसभेत एक अहवाल सादर केला. या अहवालात गेल्या वर्षी 2023 मध्ये 2 लाख 16 हजारांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी यावेळी नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांची 2019 ते 2023 या वर्षातील आकडेवारी जाहीर केली आहे.
पहा आकडेवारी
या आकडेवारीनुसार 2022 या वर्षात 2 लाख 25 हजार 620 नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते. त्यानंतर 2023 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र तरीही ही संख्या खूप जास्त आहे. दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीमध्ये 2019 या वर्षात 1 लाख 44 हजार 017 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते. तसेच 2020 मध्ये 85 हजार 256 आणि 2021 मध्ये 1 लाख 63 हजार 370 भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला होता.
नागरिकत्व सोडण्यामागे विविध कारणे
भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, या संदर्भात विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. या प्रश्नावर सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे विरोधक मागणी करीत आहेत. तर दुसरीकडे, अनेक भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडण्याची विविध कारणे आहेत. भारताचे नागरिकत्व सोडलेल्या अनेक नागरिकांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, दुबई, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रगतशील देशांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. या देशांमध्ये उच्च राहणीमान, चांगले वातावरण, उच्च शिक्षण, नोकरीत चांगल्या संधी आणि पगार, कायदा आणि सुव्यवस्था यांसारख्या अनेक गोष्टी आणि सुविधा असल्यामुळे लोकांना या देशांमध्ये राहण्यासाठी आकर्षित करतात, असे म्हटले जात आहे.