पुणे, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील अनेक धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तरी हा पाण्याचा विसर्ग धरणांतील पाण्याचा साठा आणि पावसाच्या परिस्थितीवर कमी जास्त प्रमाणात करण्यात येईल, अशी सूचना पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. खडकवासला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार, आज (दि. 02 ऑगस्ट) दुपारी 2.00 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 16 हजार 247 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे उपविभाग मुठा कालवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1819291620124078324?s=19
https://x.com/Info_Pune/status/1819278595069526135?s=19
https://x.com/Info_Pune/status/1819244493452808473?s=19
https://x.com/Info_Pune/status/1819280383378100674?s=19
https://x.com/Info_Pune/status/1819214290735583440?s=19
या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
त्याचबरोबर, आज सकाळी 11 वाजता मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये 5 हजार 723 क्यूसेक करण्यात येत आहे. तसेच भोर येथील निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याने नीरा धरण 94 टक्के भरले आहे. त्यामुळे निरा देवघर धरणातून आज सकाळी 9 वाजता 3 हजार 403 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. सोबतच मुळशी धरणात सध्या 96 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सध्या 18 हजार 11 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुण्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती
दरम्यान, सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामध्ये खडकवासला धरणात शुक्रवारी (दि. 02 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता 74.23 टक्के इतका पाणीसाठा होता. त्याचवेळी पानशेत धरणात 90.89 टक्के, वरसगाव धरणात 93.04 टक्के आणि टेमघर धरणात आज सकाळी 7.45 वाजता 95.81 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.