मुंबई, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोल्हापूरचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीबद्दल त्याचे देशभरातून कौतुक केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन स्वप्नीलला राज्य सरकारच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. दरम्यान स्वप्नील कुसाळे याने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.
https://x.com/ANI/status/1818995559652585676?s=19
https://x.com/CMOMaharashtra/status/1819032147656683625?s=19
स्वप्नीलचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
या कामगिरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्नील कुसाळे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. “शाब्बास स्वप्नील, तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नीलचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्वप्नील कुसाळे याचे प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे हे देखील सहभागी झाले होते.
https://x.com/mieknathshinde/status/1819004639980708128?s=19
आवश्यक ते सहकार्य करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनातून स्वप्नील कुसाळेच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. स्वप्नीलने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलच्या नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या वडिलांना दिली आहे. कुसाळे कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. तसेच त्याच्या गेल्या 12 वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.