मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावले कांस्यपदक!

पॅरिस, 01 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत कोल्हापूरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. त्याने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. दरम्यान, रायफल थ्री पोझिशनमध्ये शूटर तीन पोझिशनमध्ये निशाणा लावतो. यामध्ये उभे राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशा तीन प्रकारे शूटिंग केली जाते. अशा प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

https://x.com/India_AllSports/status/1818924293864276002?s=19

पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

या स्पर्धेत स्वप्नीलने पुरूषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवले. यावेळी स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. या कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्नील कुसाळे याचे अभिनंदन केले आहे. “स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये पुरूषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण, त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे.” असे ट्विट करून नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे.

मनू भाकरने 2 पदके जिंकली

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. विशेष म्हणजे, याआधीची भारताची दोन पदके नेमबाजीतच आली आहेत. त्यामुळे भारताने एकाच ऑलिम्पिक पहिल्यांदाच नेमबाजीत तीन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे. याआधी, भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर पिस्तुलमध्ये भारतासाठी सर्वप्रथम कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर सरबज्योत सिंग आणि मनू भाकर सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टल मिश्र गटातील कांस्यपदकाच्या लढतीत एकत्रितपणे कांस्यपदक जिंकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *