ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ!

दिल्ली, 01 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सरकारने देशातील जनतेला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला महागाईचा झटका दिला आहे. त्यानुसार, 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आता 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाली आहे. तर दूसरीकडे 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

किती दर वाढले?

या नवीन दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 1 हजार 646 रुपयांवरून 1 हजार 652.50 रुपये इतकी झाली आहे. त्याचवेळी मुंबईत हा गॅस सिलिंडर 1 हजार 598 रुपयांवरून 1 हजार 605 रुपये, चेन्नईत 1 हजार 809.50 रुपयांवरून 1 हजार 817 रुपये आणि कोलकात्यात 1 हजार 756 रुपयांवरून 1 हजार 764.50 रुपयांना मिळत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 30 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यावेळी व्यवसायिकांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतू, आता गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ केल्यामुळे आता व्यवसायिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

घरगुती गॅसच्या किंमतीत बदल नाही

तर दुसरीकडे 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल 9 मार्च 2024 रोजी करण्यात आला होता. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना मिळत आहे. त्याचवेळी हा घरगुती गॅस सिलिंडर मुंबईत 802.50 रुपयांना, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना विकत मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *