भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात! युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

पल्लेकेले, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 क्रिकेट मालिकेला आजपासून (दि. 27 जुलै) सुरूवात होणार आहे. 3 टी-20 क्रिकेट सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळविण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, टी-20 क्रिकेट विश्वचषकानंतर भारतीय संघाची ही दुसरी मालिका असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड होईल, अशी अपेक्षा सर्वजण करीत होते. परंतु, निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

https://x.com/ICC/status/1816784360193839545?s=19

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक

तसेच राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची निवड केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका असणार आहे. दरम्यान, भारताने काही दिवसांपूर्वी 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या वरिष्ठ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. अशा परिस्थितीत टी-20 संघाची जबाबदारी आता युवा खेळाडूंवर आली आहे. त्यामुळे या युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष असणार आहे.

कोणाला संधी मिळणार?

श्रीलंका विरुद्धच्या आजच्या सामन्यात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे सलामीला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल, हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबे, सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंग येण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांसह रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा संघ कसा असणार? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

टी-20 मालिकेसाठी निवड झालेला भारतीय संघ:-

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, रियान पराग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *