पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह या जिल्ह्यांतील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर!

पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) येत्या 24 तासांत राज्याच्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पुणे, सातारा, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी (दि. 26 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश सबंधित जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

https://x.com/Info_Pune/status/1816492954682352032?s=19

पुणे जिल्ह्यातील येथील शाळांना सुट्टी

पुढील 24 तासांसाठी राज्यातील पुणे, सातारा, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घेतला आहे. त्यानुसार, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळांना शुक्रवारी (दि. 26 जुलै) सुट्टी देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे.

सातारा रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

याशिवाय, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व शाळा, महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा निर्णय साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे. यासोबतच पावसाचा धोका लक्षात घेता, रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आहे.

https://x.com/ANI/status/1816475620353995221?s=19

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

तसेच हवामान विभागाने शुक्रवारी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमाच्या आणि मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *