पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुणे शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट घोषित केला आहे. पुणे शहरातील मुळा मुठा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुठा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराच्या अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
https://x.com/ANI/status/1816289410260033787?s=19
https://x.com/ANI/status/1816346921159823804?s=19
शहरातील अनेक भागांत पूरस्थिती
पुण्यातील खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहराच्या एकता नगर, विठ्ठल नगर, निंबजनगर सिंहगड रोड, रजपूत विट भट्टी, खिलारेवाडी, तपोधाम, वारजे, पुलाचीवाडी, डेक्कन, पाटील इस्टेट या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. या आपत्कालीन परिस्थितीसाठी पुणे अग्निशमन दलाचे जवान सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील एकता नगर परिसरात एनडीआरएफच्या तीन तुकड्या, भारतीय लष्कराचे पथक आणि सिंहगड रोडमध्ये दोन तुकड्या आणि वारजेमध्ये एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या भागांत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या वीस अधिकाऱ्यांसह जवळपास तीनशे जवान शहरातील विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
https://x.com/ANI/status/1816380252396085579?s=19
https://x.com/mohol_murlidhar/status/1816368396566757800?s=19
https://x.com/madhurimisal/status/1816383593775501779?s=19
बचावकार्य सुरू
त्यानुसार, अग्निशमन विभागाने आज पुणे शहरातील निंबजनगर परिसरात अडकलेल्या 70 जणांची सुटका केली आहे. तसेच रजपूत विट भट्टी, खिलारेवाडी येथील 50 नागरिक, तपोधाम, वारजे येथील 48, पुलाचीवाडी, डेक्कन येथील 15, पाटील इस्टेट येथील 10 तसेच सिंहगड रोड परिसरातील 120 नागरिकांना सध्या बोटींनी सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तेथील बचाव कार्याचा प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक नेत्यांकडून आढावा घेण्यात आला आहे.
https://x.com/Info_Pune/status/1816362507893653689?s=19
मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
या पावसाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू असून ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे, येथील बचाव कार्य वेगाने सुरू आहेत. काळजीचे कारण नाही. मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्रित येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.