पुणे, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मध्य रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनेक गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 202 ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे गाड्या 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग उद्यापासून (दि. 21 जुलै) सुरू होणार आहे. याची माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी आज दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
https://x.com/ANI/status/1814578123360641397?s=19
https://x.com/airnews_mumbai/status/1814302299499454972?s=19
रेल्वे प्रशासनाने गाड्यांची माहिती दिली
या ज्यादा रेल्वे गाड्यांची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामध्ये गणेशोत्सवाच्या 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर रेल्वेच्या 18 ट्रिप, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरीसाठी 18 ट्रिप, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या मार्गी 18 ट्रिप, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी साठी 18 ट्रिप, दिवा ते चिपळूण मेमू दरम्यान 18 ट्रिप, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या मार्गावर स्पेशल 16 ट्रिप आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ येथे रेल्वेच्या स्पेशल 6 ट्रिपचे नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखो लोक मुंबईतून कोकणात जात असतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर, गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास अधिक सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या स्पेशल 202 गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.