नागपूरात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नागपूर, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागपूर शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

https://x.com/InfoNagpur/status/1814507446716801256?s=19

वीज गर्जना होत असताना बाहेर पडू नये

नागपूर जिल्ह्यात हवामान विभागाने 21 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पर्यटकांनी पाण्यात उतरू नये

तसेच नागरिकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यातो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस कोणीही करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्ट असले तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही नागपूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

नागपूरात मध्यरात्रीपासून पाऊस

दरम्यान, नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे नागपूर शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरात, गोडाऊन आणि दुकानात पाणी शिरले होते. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *