पनवेल, 16 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला चाललेल्या 5 भाविकांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हे भाविक एका खाजगी बसमधून आषाढी वारीसाठी पंढरपूरला चालले होते. त्यावेळी त्यांची बस आणि ट्रॅक्टर यांची मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जोरदार धडक झाली. या अपघातात 5 भाविक ठार झाले. तर 42 जण जखमी झाले आहेत. हा पनवेल जवळ अपघात सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातावेळी या खासगी बसमध्ये सुमारे 84 प्रवासी प्रवास करत होते. ते एकादशी निमित्त पंढरपूरला चालले होते. ते सर्वजण डोंबिवली येथील रहिवासी होते. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
https://x.com/PTI_News/status/1813039758458888405?s=19
बस आणि ट्रॅक्टरची धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बस आणि ट्रॅक्टरमध्ये धडक झाली. या अपघातानंतर बस आणि ट्रॅक्टर ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. तसेच त्यांनी जखमींना बाहेर काढून त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. दुर्दैवाने या अपघातात 5 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, याची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.
अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे. “आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असे अजित पवारांनी म्हटले आहे.