दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद

डोडा, 16 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसांत लष्कराच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय लष्कराचे जवान सोमवारपासून जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. ही शोध मोहीम सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या डोडा येथील घनदाट जंगलात त्यांच्यावर गोळीबार करून हे दहशतवादी फरार झाले. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहे. हा हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला.

https://x.com/AHindinews/status/1813041437061095844?s=19

https://x.com/AHindinews/status/1813048047024370105?s=19

अजूनही चकमक सुरू

याठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात अजूनही चकमक सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस या दहशतवाद्यांचा संयुक्तपणे सामना करीत आहेत. डोडाच्या घनदाट जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. त्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये अशा दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली असून दहशतवादी संघटना आपली नावे बदलून हल्ल्याची जबाबदारी घेत आहेत.

https://x.com/rajnathsingh/status/1813093596813533461?s=19

राजनाथ सिंग यांनी दुःख व्यक्त केले

दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात उरार बागी येथे दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या शूर आणि साहसी भारतीय सैन्याच्या जवानांच्या हौतात्म्याने खूप दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत देश खंबीरपणे उभा आहे. दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे आणि आमचे सैन्य दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी वचनबद्ध आहेत,” असे राजनाथ सिंग यांनी यामध्ये म्हटले आहे.

https://x.com/RahulGandhi/status/1813085715695346045?s=19

राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील याबाबत ट्विट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आज पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत आपले जवान शहीद झाले. शहीदांना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करून, मी शोकसंतप्त कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. हे सततचे दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीरची बिकट स्थिती उघड करत आहेत. भाजपच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत. वारंवार होणाऱ्या सुरक्षेतील त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारून देशाच्या आणि सैनिकांच्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही प्रत्येक देशभक्त भारतीयाची मागणी आहे. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *