पेन्सिल्वेनिया, 14 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारसभा सुरू असताना हा प्रकार घडला. डोनाल्ड ट्रम्प हे मंचावर बोलत होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानकपणे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. या हल्ल्यामुळे त्याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. दरम्यान, या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
https://x.com/ANI/status/1812271060408230250?s=19
हल्लेखोर मारला गेला
अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत ट्रम्प हे मंचावर उभा राहून बोलत असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यावेळी अचानकपणे एका व्यक्तीने त्यांच्यावर एकामागून एक गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते लगेचच खाली वाकले. डोनाल्ड ट्रम्प या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गोळीबाराच्या घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांना टेजवरून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यावेळी ट्रम्प यांनी उजव्या कानावर हात ठेवला होता. त्यांच्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त स्पष्ट दिसत होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या प्रकरणात हल्लेखोर मारला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच या प्रचारसभेत सहभागी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी असल्याचे देखील सांगितले जात आहे. या गोळीबाराच्या घटनेचा तपास सध्या येथील सुरक्षा यंत्रणा करीत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून हल्ल्याचा निषेध
दरम्यान, या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. पेनसिल्व्हेनियातील त्यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षित आहेत याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत जागा नाही. ट्रम्प यांच्याशी लवकरच बोलणे होईल, अशी मी आशा करतो. असे ते म्हणाले आहेत. सोबतच जो बायडन यांनी या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
https://x.com/narendramodi/status/1812315611940176344?s=19
पंतप्रधान मोदींनी केला हल्ल्याचा निषेध
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “माझे मित्र, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याबद्दल खूप चिंतित आहेत. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत, जखमी आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये म्हणाले आहेत.