घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; पोलिसांकडून कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई, 13 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील घाटकोपर परिसरातील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने या आरोपींच्या विरोधात कोर्टामध्ये 3 हजार 299 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात बीएमसीचे दोन अधिकारी आणि सहा जीआरपी अधिकाऱ्यांच्या जबाबांचा देखील समावेश आहे. याबाबतची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1812040771962568973?s=19

दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू

मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपावर 13 मे रोजी सायंकाळी बेकायदेशीर लावण्यात आलेले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 17 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यावेळी होर्डिंगच्या खाली अनेक लोक आणि वाहने अडकले होते. तसेच या दुर्घटनेत सदर पेट्रोल पंपाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याचा देखील समावेश आहे. याप्रकरणी हे चौघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

आरोपी भावेश भिंडे अटकेत

दरम्यान, भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक आहे. भिंडे याच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपर मधील एका पेट्रोल पंपावर बेकादेशीरपणे मोठे लोखंडी होर्डिंग लावले होते. 13 मे रोजी झालेल्या वादळी पावसात हे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे फरार झाला होता. त्याचा पोलीस सगळीकडे शोध घेत होते. पोलिसांना चार दिवसांनी त्याचा शोध लागला. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने भावेश भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *