EPFO बाबत मोठी गुड न्यूज! व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय

दिल्ली, 12 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) देशातील सुमारे 7 कोटी EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता. त्याला आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने ईपीएफओ च्या सदस्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे.

https://x.com/socialepfo/status/1811329839695036879

सोशल मीडियावरून दिली माहिती

ईपीएफओ ने 2023-24 साठी नवीन व्याजदर जाहीर करताना गेल्या वर्षीच्या 8.15 टक्के व्याजदरावरून 8.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याबाबतची माहिती ईपीएफओ ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे. त्यामुळे ईपीएफओ चे सदस्य आता हे व्याज त्यांच्या खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता. त्यावेळी पीएफवरील वार्षिक व्याजदर 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्याला आता त्यांनी मान्यता दिली आहे.

2022 मध्ये 8.10 टक्के व्याजदर होता

तत्पूर्वी, गेल्या वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओ ने 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. तर ईपीएफओ ने मार्च 2022 मध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी व्याजदर 8.10 टक्के केला होता. तेंव्हा 7 कोटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला होता. दरम्यान, ईपीएफओ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे 7 कोटी कर्मचारी नोंदणीकृत आहेत. ईपीएफओ ने व्याजाचा निर्णय घेतल्यानंतर याबाबत अर्थमंत्रालय अंतिम निर्णय घेते. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज वर्षातून एकदा 31 मार्च रोजी दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *